💥दुर्गापूर, चंद्रपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी💥
बुधवार, दिनांक १८/०४/२०१८ रोजी पंचशील बौद्ध विहार, भीम नगर, दुर्गापूर, चंद्रपूर येथे समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने डॉ.आंबेडकर जयंती व बुद्ध जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात समता सैनिक दलाची प्रतिज्ञा वाचून करण्यात आली. या कार्यक्रमात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणित बुद्धाचे राजकीय तत्वज्ञान तसेच वर्तमानातील समस्या व त्यावरील उपाययोजना’ या विषयावर मते मांडण्यात आली. आयु अविनाश बेले, दुर्गापूर यांनी सद्यपरिस्थित भिक्खुंची ‘दिशा आणि दशा’ यावर प्रकाश टाकला व सोबतच उपस्थितांना रिपब्लिकन चळवळ मजबूत करण्याचे आवाहन केले. आयु. शार्दूल गणवीर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
भन्ते महातिस्स यांनी बौद्धांनी बावीस प्रतिज्ञा इमाने इतबारे पाळण्याबाबत मार्गदर्शन केले. आयु.अशोक टेम्भरे यांनी बुद्धाच्या जयंतीचे राजकीय महत्व उपस्थितांना पटवून दिले व देशातील भयाण परिस्थितीतून सावरण्याचा मार्ग म्हणून रिपब्लिकन पार्टी कडे बघण्याचे सुचविले. आयु. प्रवीण कांबळे यांनी चुकीच्या मार्गावर मार्गक्रमण करणाऱ्यांनी आता बुद्ध तत्त्वज्ञानावर आधारित रिपब्लिकन चळवळीची वाट धरून बाबासाहेबांनी दिलेल्या संघटनेस सशक्त करण्याकडे वाटचाल करणे काळाची गरज आहे यावर आपल्या वक्तव्यातून भर दिला. आयु. प्रशिक आनंद यांनी संबंधित विषयावर आपला गौरवशाली इतिहास आणि सार्वजनिक जीवनात तथागत बुद्धाने सांगितलेल्या वैज्ञानिक सिद्धांताना प्रस्थपित करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष आणि त्यानंतर न्यायाद्वारे समाज जीवनात निर्माण होऊ शकणारे शांतीमय जीवन हे विशद करतांना रिपब्लिकन पार्टी च्या सिद्धांतात बुद्धधम्माची पाळेमुळे कशी आहेत हे पटवून दिले. रिपब्लिकन पार्टी ही प्रत्येक व्यक्तीचे सुख हे केंद्रबिंदू मानत आल्यामुळे कोणत्याही दलित-बहुजन-मूलनिवासी चळवळीपेक्षा रिपब्लिकन चळवळ ही बाबासाहेबांनी एकंदरीत सर्व भारतीयांना दिलेली अमूल्य देण होय याची प्रचिती आणून दिली.
आयु. प्रमोद वाळके, नागपूर यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती. अतिशय सुरेख असे सूत्रसंचालन आयु. प्रशांत कऱ्हाडे, वरोरा यांनी केले.
समता सैनिक दलाच्या सर्व कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमात महिलांनी, व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या लक्षणीय सहभागाबद्दल व कार्यक्रमास यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल उपस्थित सर्व समाज बांधवांचे आभार.
जय भीम
द्वारा : समता सैनिक दल, चंद्रपूर
www.ssdindia.org