61 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व समता सैनिक दल बैठक, ठाणे ३० सप्टें २०१७


 

◾समता सैनिक दल आणि समता सेवा संघ, शेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे इतिवृत्त.◾

61 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून संघटनात्मक वाढीसाठी समता सैनिक दलाच्या मुंबई व ठाणे जिल्ह्यातील सैनिकांच्या एका बैठकीचे आयोजन शेलू येथील समता सैनिक दलाचे सैनिक आयु. विजय बनकर यांच्या निवासस्थानासमोरील प्रांगणात दिनांक 30 सप्टेंबर, 2017 रोजी करण्यात आले होते. तसेच, आयु. बनकर यांच्या राहत्या घरी याच दिवसाचे औचित्य साधून आदर्श रूप तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि विश्वरत्न महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस्थापनेचा कार्यक्रमही असल्याचे अनौपचारिकरित्या सांगण्यात आले होते. शेलू येथे सैनिकांचे आगमन झाल्यानंतर वरील कार्यक्रमासोबतच तेथील समता सैनिक दलाच्या सैनिकांनी स्थानिक समता सेवा दल यांच्यासह 61 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त एका छोट्या सभेचेही आयोजन केल्याचे दिसून आले.

याअनुषंगाने, प्रथमतः आयु. विजय बनकर यांच्या निवासस्थानी वरील महामानवांच्या मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम समता सैनिक दलाचे सैनिक तसेच धम्म प्रचारक म्हणून कार्यरत असलेले आयु. अभयादित्य बौद्ध यांचे मार्गदर्शन व बौद्ध पूजा विधी करून संपन्न झाला.

त्यानंतर, समता सैनिक दल व समता सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 61 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित जाहीर सभेस सुरूवात झाली. या सभेत समता सैनिक दलाचे सैनिक आयु.अशोक भरणे यांना मार्गदर्शनपर विचार व्यक्त करण्यासाठी विनंती करण्यात आली. त्यास अनुसरून, ” डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 आॅक्टोबर, 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा महास्थवीर चंद्रमणी यांच्या हस्ते स्वतःआपल्या पत्नीसह घेऊन त्यानंतर स्वतःच आपल्या लाखो बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.हे बाबासाहेबांनी केलेल्या धम्मचक्र प्रवर्तनाचे वैशिष्ट्य नमूद करून ही बाब यापूर्वी कधीही घडली नसल्याने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे या अर्थाने आधुनिक धम्म प्रवर्तक ठरतात”, असे प्रतिपादन आयु. अशोक भरणे यांनी आपल्या भाषणात केले. तसेच, बाबासाहेबांनी समता सैनिक दल का निर्माण केले, हे देखील त्यांनी विशद केले.

त्यानंतर,आपल्या भाषणात सैनिक आयु. नितीन गायकवाड यांनी आपण सर्व नागवंशीय आहोत, हे उदारणांसह स्पष्ट केले. सैनिक आयु. अजय माळवे यांनी स्वविकास करून चळवळीत योगदान देण्याविषयी भर दिला. सैनिक आयु. अनिकेत कांबळे यांनी युवकांना समता सैनिक दलात सामील होण्याविषयी आवाहन केले. सैनिक आयु. विशाल सुर्वे व अभिजित किर्तीकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. सैनिक आयु. सागर गरूड यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथांचे महत्त्व लक्षात घेऊन ते आपण सर्वांनी वाचले पाहिजे व त्यानुसार चळवळीत सहभाग दिला पाहिजे, यावर आपल्या भाषणात भर दिला. तसेच, समता सेवा दल, शेलू या संस्थेचे अध्यक्ष आयु. दिलीप गायकवाड यांनीही संस्थेच्या वतीने प्रातिधिनिकपणे उपस्थित सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सैनिक आयु. विजय बनकर यांनी सुयोग्य पद्धतीने केले. या सभेत सुमारे 60 ते 70 लोक उपस्थित होते. त्यानंतर, आयु. बनकर यांच्या कुटुंबियांच्या वतीने उपस्थित सर्वांना भोजन देण्यात आले. तसेच सदर कार्यक्रमाची सांगता झाली.

समता सैनिक दल, मुंबई व ठाणे जिल्ह्यातील उपस्थित सर्व सैनिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत वार्षिक कृतीकार्यक्रम देण्यात आला व तो राबविण्याबाबत सैनिक आयु. सागर गरूड व आयु.अशोक भरणे यांनी मार्गदर्शन केले व बैठक समाप्त झाली. सदर बैठकीत सुमारे 20 ते 25 सैनिक उपस्थित होते.

वरील सर्व कार्यक्रम सकाळी 11.00 ते संध्या.05:00 या कालावधीत संपन्न झाले.

समता सैनिक दल
( मुख्यालय : दीक्षाभूमी, नागपूर) 
www.ssdindia.org

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *