🏵 समता सैनिक दलातर्फे आयोजित धम्मट्रॉफी परीक्षा संपन्न 🏵
रविवार दि. २० जानेवारी २०१९ रोजी समता सैनिक दल, दीक्षाभूमी नागपूर तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या तत्वज्ञानावर आधारीत परीक्षेचे आयोजन करण्यात आले. शहरातील तीन विद्यालयात, विरेंद्र हायस्कुल, नागसेन विद्यालय, भारती कृषी विद्यालय येथे सदर परीक्षा एकाच वेळेस घेण्यात आली. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आयु. प्रशिक आनंद यांनी परीक्षा संपल्यावर नागसेन विद्यालय येथे जवळपास एक तास उपस्थित विद्यार्थ्यांना मानवी जीवनात वाटचाल करण्यासाठी मैत्री (बंधुत्व), स्वातंत्र्य व समता या तत्वज्ञानाचे महत्व विशद करून सांगितले. हे सांगतांना ‘क्रांती व प्रतिक्रांती’ म्हणजे काय याची तोंडओळखही करून देण्यात आली.
विद्यार्थ्यांना सांघिक वृत्तीचे महत्व विशद करतांना भावी जीवनात रिपब्लिकन भारताचा सुजाण नागरिक होऊन संविधानाचा अंमल करण्यासाठी बाबासाहेबांनी सुचविलेल्या मार्गाचा अवलंब करणे व त्यासाठी संघटीत प्रयत्न करणे अगत्याचे आहे याची जाणीवही त्यांना करून दिली. सदर परीक्षेचे यशस्वी नियोजन आयु. सविता उमरे, आयु. इंदू सातपुते, आयु. शालिनी कानफाडे, आयु. गौतमी सोरदे यांनी केले. समता सैनिक दलाचे जेष्ठ कार्यकर्ते आयु. शंकर दामके तसेच धडाडीचे कार्यकर्ते आयु. प्रमोद वाळके यांनी परीक्षेच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. सदर परीक्षेचा निकाल दि. ३ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता इंदोरा बौद्ध विहार, नागपूर येथे जाहीर करण्यात येणार आहे.
द्वारा : समता सैनिक दल,
HQ- दीक्षाभूमी नागपूर
www.ssdindia.org