मी रिपब्लिकन का आहे ?
जय भीम……..
बाबासाहेबांबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि तो अभिमान आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत राहील. बाबासाहेबांच्या उपकाराची परतफेड आम्ही आमच्या अंगाच्या कातडीचे चपला-जुते जरी बनवून बाबासाहेबांसमोर अर्पण केल्यात तरी त्यांच्या उपकाराची परतफेड आम्ही उभ्या आयुष्यात करू शकत नाही. ही जाणीव तुम्हा आम्हा सर्वांनाच आहे.
असे असतांना सुद्धा आम्ही बाबासाहेबांच्या अपेक्षित कार्याला सरस उतरलो नाही. उलट बाबसाहेबांनी निर्माण केलेली समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि बाबासाहेबांनी त्यांच्या जिवंतपनीच मुहूर्तमेढ केलेल्या रिपब्लिकन पार्टी आफ इंडियाला तिलांजली देवून स्वत:च्या हव्या तितक्या आंबेडकरी पार्ट्या काढून बाबासाहेबांच्या महान विचाराच्या विरोधात जावून कुणी जातीचे (महार,मंग,चांभार,कुणबी आदी) चे राजकारण केले तर कुणी मूलनिवासी ८५% बहुजनवादाचे राजकारण सुरु केले. या सर्वात मात्र बुद्धाच्या धम्माला तिलांजली देवून तो धम्म गावाच्या वेशीवर नेवून टांगण्यात आला. स्वार्थी राजकारणाच्या आडोशात बुद्ध धम्मावर प्रतिक्रांती करण्यात आली. त्यामुळे जातीचे राजकारण करण्यासाठी ना या नेत्यांनी स्वत: बुद्ध धम्म स्वीकारला ना कुणाला स्वीकारू दिला. एवढ्यानेच त्यांचे समाधान झाले नाही तर बाबासाहेबांनी आम्हाला आमच्या उत्पन्नाचा विसावा भाग बुद्ध धम्माच्या उत्कर्षासाठी जो दान करायला लावला होता तो या आंबेडकरी नेत्यांनी गटाचे आंबेडकर राजकरण करण्यासाठी गिळंकृत केला. आजही आमच्या उपन्नाचा विसावा भाग बुद्ध धम्माच्या उत्कर्षासाठी न जाता या नेत्यांच्या राजकीय पार्ट्या चालविण्यासाठी आणि त्यांचे संम्मेलन भरविण्यासाठी जात आहे. ज्यातून काहीच साध्य होऊन नाही राहिले.
उलट यांच्या राजकीय पार्ट्या चालविण्यासाठी बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी निर्माण केलीच नाही असा अपप्रचार स्वत:ची संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. हेतुपुरस्सर आंबेडकरी जनतेच्या मनात रिपब्लिकन विषयी विष पेरण्यात आले आणि पेरल्या जात आहे. या सर्वात रिपब्लिकन पार्टी ला टोपल्याने शिव्या हादडण्यात आल्या. रिपब्लिकन पार्टी च्या नेत्यांच्या फुटीर वृत्तीचा दोष रिपब्लिकन पार्टी ला शिव्याच्या रुपात देण्यात आला. परंतु हे शिवा देणारे विसरलेत की ते रिपब्लिकन पार्टी ला शिव्या देण्याच्या चकरात ते बाबासाहेबांना अप्रत्यक्ष शिव्या देत होते आणि शिवा देत आहेत. कारण सर्वसमावेशक रिपब्लिकन संकल्पना बाबासाहेबांनीच मांडली होती.
रिपब्लिकन पार्टी चे गट पडले असेल तर याला आम्हीच दोषी होतो. कारण आम्हीच कधी ‘रिपब्लिकन चळवळ‘ समजून घेतली नाही. उलट बाबासाहेबांच्या रिपब्लिकन संकल्पनेला नाकारून आम्ही स्वत:चे अतिशहाणे डोके लावून रिपब्लिकन चळवळ ऐवजी आंबेडकरी चळवळ नाव देवून मोकळे झालोत. यातून काय झाले तर ज्यांना जसे वाटले तसे त्यांनी गट पाडून स्वत:ची वेगवेगळी एक नवीन पार्टी काढली. बाबासाहेबांची रिपब्लिकन अशी एकमेव मास्टर चावी होती जी सर्व आंबेडकरी नेत्यांना एकसूत्रात बांधून ठेवणारी होती आणि ती चावी बाबासाहेबांनी आमच्या हाती दिली होती. बाबासाहेबानंतर रिपब्लिकन चळवळ हेतुपुरस्सर बाजूला सारून त्यावर आंबेडकरी चळवळीचे पांघरून घालून नंतर सुरु झाले बाबासाहेबांच्याच विचाराच्या विरुद्ध दलित,मूलनिवासी,८५% बहुजनवादाचे राजकारण. यातून जे साहित्य निर्माण झाले तेही जातीवादी आणि कथा- कवितांचे झाले. मग कुणी आईवर कविता लिहित बसले तर कुणी कादंबऱ्या लिहित बसले. ज्यातून मनोरंजनाशिवाय दुसरी कोणतीच क्रांती झाली नाही. कथा कादंबऱ्या वाचण्यातच आमचा बराचसा वेळ गेला ज्यामुळे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली क्रांती खुंटल्या गेली. जे दलित साहित्य उभे राहिले त्यातून बाबासाहेबांना संकुचित वृत्ती ठेवून बुद्ध धम्माचे महान प्रवर्तक एवजी दलितांचा नेता घोषित करण्यात आले. ज्यामुळे बुद्ध धम्माच्या प्रच्रार प्रसाराला सर्वात मोठा आघात झाला. ईतकच नाही तर काही नेत्यांनी बाबासाहेबांना ‘महार’ या जातीत अडकवून राजकारण केले. सर्रास बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधात जातीचे, मूलनिवासीवादाचे, ८५% बहुजन वादाचे राजकारण करण्यात आले. बुद्धाची बहुजन थेअरी ही फक्त निवडक कुण्या ८५% लोकांसाठी नव्हतीच तर पूर्ण १००% लोकांसाठी होती हे आम्हाला कधी कळलंच नाही.
‘माझ्या नावाचा उल्लेख कुठे करा’ असे कुठेच बाबासाहेबांनी म्हटले नाही आणि आम्ही तेच करत बसलोत ज्यामुळे बाबासाहेबांच्या महान अशा सर्वसमावेशक ‘रिपब्लिकन संकल्पनेला’ नाकारत गेलोत…आणि ईथेच आमचे बारा वाजत गेलेत. १९५६ नंतर जोरजोराने भाषणातून बाबासाहेब सांगणाऱ्या नेत्यांच्या तोंडून २०१४ पर्यंत मानवी कल्याणाचा एकाही फुटाणा फुटला नाही. बाबासाहेबांची रिपब्लिकन थेअरी नाकारल्यामुळे ना आम्ही आमची सत्ता आणू शकलो, ना धम्म क्रांती करू शकलो,ना आम्ही एकत्र राहू शकलो आणि ना बाबासाहेबांच्या रिपब्लिकनचा धाक दाखवून आमच्या विखुरलेल्या नेत्यांना एकसूत्रात बांधू शकलोत. सर्व काही विस्कळीत होत गेल आणि आम्हीही ते सर्व निशब्द उघड्या डोळ्याने पाहत गेलोत. बाबासाहेबांच्या उपकराची परतफेड करायची असेल तर बाबासाहेबांची पूर्ववत ‘रिपब्लिकन चळवळ’ उभी केल्या शिवाय पर्याय नाही. ही जबाबदारी कुण्या नेत्यांची नसून बाबासाहेबांच्या प्रामाणिक प्रज्ञावान पिल्यांची आहे,सर्वांची आहे.
शेवटी हेच …..
…..मी बाबासाहेबांना प्रामाणिक आहे त्यामुळे मी रिपब्लिकन आहे.