३० जून २०१९ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुदा-२०१९ ची ‘पोलखोल’


धम्मट्रॉफी परीक्षेच्या बक्षीस वितरण समारोहाप्रसंगी सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुदा-२०१९’ ची पोलखोल’

‘मे’ महिन्यात अमर ज्योती नगर येथील उपाली बौद्ध विहार, नागपूर येथे बौद्ध धम्म तत्वज्ञान या विषयावर ‘रिपब्लिकन पक्षाची’ आघाडीची फौज असलेल्या ‘समता सैनिक दलातर्फे’ परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा निकाल दि.३० जून २०१९ रोजी रविवारी सकाळी ११ वाजता जाहीर करून विद्यार्थ्यांसाठी बक्षीसे वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीस शैक्षणिक जनजागृती अभियानाअंतर्गत ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुदा-२०१९’ या विषयावर आयु. प्रशीक आनंद यांनी सरकारचे हे शैक्षणिक धोरण कसे फसवे असून शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरण करून बहुसंख्याक जनतेच्या हितास ते कसे बाधा आणणारे आहे व देशात पुन्हा ‘ब्राह्मणवाद व भांडवलवादास’ खतपाणी देऊन त्यांनाच ते अधिकाधिक कसे पूरक ठरणारे आहे याची उपस्थितांना जाणीव करून दिली. मानवी जीवनात शिक्षण ही ‘स्वविकासाची’ बाब असल्याने व मानवी जीवनाची ती महत्वाची ‘गरज’ (want) असल्या कारणाने त्या ‘गरजेतून मुक्तता’ (freedom from want) करण्याची जबाबदारी हे राज्याचे (state) कर्तव्य आहे याची शासनसंस्थेस वेळोवेळी जाणीव आपण करून दिली पाहिजे अशी मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टीसाठी लिहिलेल्या मानव मुक्तीच्या तत्वांत आढळत असल्यामुळे नेमके हे धोरण मात्र त्या ‘तत्वांनाच’ छेद देणारे ठरते आहे याची त्यातून प्रचिती येते. आणि म्हणूनच हे धोरण निश्चितच आक्षेपार्ह आहे. मा. प्रा. देविदास घोडेस्वार सरांच्या विवेचनातून आकलन झालेल्या बाबी प्रामुख्याने विचारात घेऊन याप्रसंगी सदर मसुद्यावर मांडणी करण्यात आली. हे धोरण आक्षेपार्ह असल्याने आपण कदापिही त्याचा स्वीकार करता कामा नये. तेव्हा या धोरणाचा अधिकाधिक अभ्यास करून, समजून घेवून समाजातील सर्व स्तरावरून नागरिकांनी आपली प्रतिक्रिया वैयक्तिक वा संघटनेच्या वतीने नोंदविण्याचा आग्रह सदर कार्यक्रमातून करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आयु. प्रमोद वाळके, आयु. दामके सर, आयुष्यमती सातपुते मॅडम, वाघमारे मॅडम, उमरे मॅडम, आयु. खोब्रागडे तसेच इतरही कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार.

समता सैनिक दल
HQ दीक्षाभूमी नागपूर
www.ssdindia.org

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *